Thursday, August 4, 2022

औट घटकेचा राजा - श्रीयाळ शेठ.( शिराळ शेठ ) , श्रीयाळ षष्ठी उत्सव - अर्थात - श्रीयाळ शेठ राजाची महती .

 

औट घटकेचा राजा - श्रीयाळ शेठ.( शिराळ शेठ ) 


           औट घटकेचा राजा - श्रीयाळ शेठ.( शिराळ शेठ ) 

        श्रीयाळ षष्ठी उत्सव - अर्थात -  श्रीयाळ शेठ राजाची महती .


सातारा, दि.4 - 

भगवान श्री शंकरांच्या काळामध्ये, श्रीयाळ शेठ नावाचा एक राजा होता, तो भगवान शंकरांचा निःसीम भक्त होता. देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते. त्याला  

' चांगुणा '  नावाची राणी होती. आणि ह्या राजा-राणीला चिलया नावाचं एकुलता एक मुलगा होता. श्रीयाळ-शेठ आणि चांगुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत. त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे. 


आणि हे राजा-राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्त्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत. कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत. तर एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि एका साधूचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. श्रीयाळ-शेठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता. पण ह्या साधूने "मला नरमांस हवे" अशी इच्छा बोलून दाखवली. पण श्रीयाळ शेठ राजाचा नियम होता कि दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये. मग नर-मांसाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली कि मला तुझ्या मुलाचेच मांस हवे. मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर पसरतो. पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शीर वेगळं करते. एकुलत्या एक मुलाची आठवण म्हणून त्याचं  कांडण केलेलं शीर ती बाजूला काढून ठेवते. आणि  फक्त धडाचे मांस शिजवते . जेव्हा ते साधू पुढे आणलं जातं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की,चांगुणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेलं मांस हे फक्त धडाचं आहे. पुन्हा एकदा क्रोधीत होऊन साधू उठू लागतो आणि म्हणतो  की, तुम्ही माझी फसवणूक करीत आहात. म्हणून पण मग श्रीयाळ-शेठ राजा आणि राणी त्या साधूचे पाय धरतात आणि माफी मागतात. आणि करुन भाकतात  की, भगवंता आता आमची किती परीक्षा पाहणार आहेस. मग चांगुणा राणी जाउन ते शीर कांडण करून शिजवून साधूला आणून देते. आणि मग राजा-राणी बोलतात की, हे साधू आता तरी आमचं सत्त्व राख आणि हे भोजन ग्रहण कर. मग साधू (भगवान शंकर) त्यांचा त्याग पाहून प्रसन्न होतात. आणि मग राजा-राणीला सांगतात की, आहे तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. आणि चांगुणेला विचारतात की, तू मला हव ते शिजवून घातलस, तुला काय हवा तो इच्छित वर माग. ती बिचारी आई पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या विरहाने हंबरडा फोडते आणि चिलया बाळाला मोठमोठ्याने हाका मारते, साधूला म्हणते की, लोक आता मला ' वांज ' म्हणतील आणि हा कलंक मला लागेल. माझा हा कलंक तू धुऊन टाकू शकतोस का? …. तोच पाहते तर काय… चिलया बाळ समोरून धावत येतो आणि आईला बिलगतो. मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात आणि त्या दोघांना दर्शन देतात. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. श्रीयाळ-शेठ राजा आणि चांगुणा राणी साक्षात भगवंतांच्या दर्शनाने धन्य पावतात. भगवान शंकर मग सांगतात की, तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो आणि तुमची भक्ती अगाध आहे. अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजेच श्रीयाळ शेठ राजाचं राज्य फक्त साडेतीन घटकांचं होतं. म्हणून ह्या राजाला  ' औट घटकेचा राजा '  असं संबोधलं जातं.  ' औट घटकेचा राजा '  हा शब्दप्रयोग बारा वर्षांच्या दुर्गादेवीच्या दुष्काळात (१३९६-१४०७) शिराळशेठीने लोकांना केलेल्या प्रचंड मदतीने खूष होऊन बहामनी राजाने त्याला पाहिजे ते मागायला सांगितल्यावर त्याने औट(साडेतीन) घटकांंसाठी सिंहासनावर बसून राज्यकारभार करू द्यायची मागणी केली आणि ती मान्यही झाली यावरून आला आहे.  






श्रीयाळ राजाचा राजवाडा  हा मातीचा बनवून आतमध्ये अन्न- धान्न्यांनी भरलेली मातीची भांडी, तसेच अन्न बनवण्यासाठी लागणारी मातीची भांडी आहेत. वरती २ घोडे आहेत. एका घोड्यावर श्रीयाळ-शेठ राजा आणि त्याचं चिलया नावाचं बाळ आहे आणि दुसऱ्या घोड्यावर चांगुणा राणी … अशा सगळ्या प्रतिकृती आहेत. शिवकालीन किंवा पूर्वीच्या काळी घरांना सजवण्यासाठी धान्न्यांचा वापर करण्यात येई. म्हणून या महालाला डाळ आणि करडईने सजवलेलं आहे. आतील मातीच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ, गहू, ज्वारी, साखर इ. धान्ये भरून ठेवलेली असतात.

                                  


            औट घटकेचा राजा - श्रीयाळ शेठ.( शिराळ शेठ )  या प्रमाणे पूजा मंडळी जाते 

         भल्या पहाटे शेतातून ताजी माती आणायची, ती मळायची आणि मग त्या मातीचा वरील चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे लाकडी पाटावर श्रीयाळ-शेठ राजाचा महाल बनवायचा, त्यामधली भांडी बनवायची, राजा-राणी आणि चिलया बाळाची घोड्यावर बसलेली प्रतिकृती बनवायची, तो महाल डाळ, करडई इ. धान्याने सजवायचा, त्यावर लिंबाचे डहाळे रोवायचे (जसे आपण गुढी-पाडव्याला गुढीला बांधतो). मग राजा-राणीला वस्त्र घालायचे आणि या सर्वांची यथासांग पूजा करायची. पूजेनंतर लोकांना तीर्थ-प्रसादाला बोलावून त्याचं दर्शन घडवण्याचं पूण्य मिळायचं. साडेतीन घटकेनंतर म्हणजे तिन्हीसांजेला या श्रीयाळ-शेठ राजाचं मग नदीला विसर्जन करायचं. नदीला विसर्जनाला जाताना "श्रीयाळ-शेठ वाण्या, खोबऱ्याच्या गोण्या" असा जयघोष करत, श्रीयाळ-शेठ राजाची प्रतिष्ठापना केलेला पाट डोक्यावर घेऊन जायचा. नदीला गेल्यावर गणपतीची आणि शंकराची आरती म्हणायची आणि नैवेद्य दाखऊन गणपती बाप्पा सारखंच विसर्जन करायचं. येताना मग नदी जवळच असलेल्या नागेश्वराच्या मंदीरात आरती करून, प्रसाद ठेऊन परत यायचं. येताना "विठूचा गजर-हरी नामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला" असा जयघोष करत घरी परतायचं.असे या उत्सवाचे स्वरूप आहे.**

संकलन  :- प्रसाद वाकडे , लेखन  सहकार्य  प्रा . अजय शेटे  वडूज 




No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...