ज्ञानपिपासू ग्रंथपिता: डॉ भीमराव पाटील. अभिषेक देशमाने सांगली
सांगली. दि 15 - अभिषेक देशमाने सांगली विशेष लेख
बागडावे, गावे, सांगावे, ऐकावे, चालावे, बोलावे, शरणांच्या सवे सुखद सहवासात रमून जावे. हे चेन्नमल्लिकार्जुनदेवा, तू दिल्या आयुष्याचे दिन उर्वरित कंठेन मी लिंगसुखींच्या संगतीत.*
*- शिवयोगिनी अक्कमहादेवी.*
योगिनी अक्कांच्या वचनाप्रमाणे शरणसंगात रमून अखंड प्रवाही ज्ञानाची लालसा असणारे व्रतस्थ ज्ञानयोगी म्हणजे भीमराव पाटील होय. आजकाल विद्यापीठाच्या अवाजवी पदव्या घेऊन त्यावर नोकरीत बढती मिळविणारे असंख्य प्राध्यापक मी पाहिले आहेत. पण अभ्यासासाठी संशोधन करणारे फक्त सर एकटेच.
किनीकद्दु या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गरीब शेतकरी कुटूंबात जन्म घेऊन उच्च विद्याविभूषित होणे हा त्यांच्या जीवनाचा अत्यंत खडतर प्रवास होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावात पूर्ण झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी पायपीट करत शेजारच्या गावी त्यांना जावे लागत असे. उच्च शिक्षणासाठी पुन्हा प्रवासाबरोबर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी राज्यशास्त्र, पाली, प्राच्यविद्या त्यांनी पदवोत्तर पदवी प्राप्त केली. तदनंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून " महात्मा बसवण्णांच्या वचनातील संविधानिक मूल्यांचा चिकित्सक अभ्यास " या विषयावर विशेष संशोधन करुन विद्यावाचस्पती ( Ph. D) प्राप्त केली आहे, हे अभिमानास्पद आहे.
*ग्रंथात भेटले, नंतर प्रत्यक्षात-*
अनेकवेळा असे घडते की एखाद्या व्यक्तीला आपण न भेटता परिपूर्ण ओळखतो, पण त्या व्यक्तीला आपली ओळख असेलच असं नाही. असच माझ्यासोबत झालं. पाटील सरांना भेटण्यापूर्वी मी त्यांचं " महात्मा बसवण्णांची जीवनकथा " हे पुस्तक मी वाचलं होतं. हे मी बसवण्णाविषयी वाचलेलं पहिलच पुस्तक होय. त्यांच्याच पुस्तकातून मला बसवण्णा समजले. सोपी , सहज वाक्यरचना आणि महत्वपूर्ण आशय हे त्यांचं पुस्तकाचे वैशिष्ट्य. एकदा वाचल्यावर दुसऱ्यावेळा वाचावे वाटले. पुन्हा वाचले. बसवण्णाविषयी काहीच माहिती नसताना या पुस्तकातून मला तंतोतंत परिपूर्ण माहिती मिळाली. नंतर पेठवडगावच्या दहाव्या शरण संस्कृती अध्ययन शिबिरात मी प्रथमच सरांना भेटलो.
*शरणकुंज : हक्काचं आश्रयस्थान*
पक्षांसारखं यावं, राहावं, खावं, मुक्त किलबिलाट करावा अस एक ठिकाण लातूर शहरात आहे ते म्हणजे " शरणकुंज" होय.शरणकुंजला कार्यकर्ताभवन हे टोपणनाव आहे.
लातूर शहरात गेल्यानंतर कार्यकर्त्याना हक्काने राहण्याची खाण्याची आणि ज्ञानाची भूक भागविणारी " शरणकुंज" ही वास्तू होय. लातुरात आग्रोया नगरात ही वास्तू दिमाखात उभी आहे. ज्ञानप्राप्तीसाठी २५ हजार ग्रंथाच समृद्ध ग्रंथालय या वास्तूत आहे. ते येणाऱ्या अभ्यासक, कार्यकर्ते, लेखक , संशोधक यांची ज्ञानाची भूक पूर्ण करते. लातुरातील आणि बाहेरुन आलेल्या कार्यकर्त्यांसाठी अनुभावगोष्टी करण्याचे हे ठिकाण आहे.
*प्राच्यविद्यासंशोधक -*
इतिहासाची साधनांच्या आधारे इतिहासाचे सत्यशुद्ध मांडणी करणारे लेखक म्हणून सर मान्यता पावले आहेत. शिलालेख, नाणी, बौद्ध स्तूप, बौद्ध स्थळे, शरण स्थळे, मंदिरे, प्राचीन बावी, किल्ले, पुराणग्रंथ, लोकसाहित्य, जनमत या सर्व साधनांच्या आधारे सरांनी इतिहास लेखन केले आहे. आजवर ४४ ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.
*८० पेक्षा जास्त ग्रंथाचे रचयते -*
शरणांनी विचार जिवंत ठेवण्यासाठी शस्त्र हाती घेतले. वचनरुपी विचार ही ज्ञानज्योती आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वचन अमृत, संजीवनी आहे. शरणांच साहित्य आत्मविकास घडवून आणणारे साहित्य आहे. बसवोतर काळात विरक्तानी हे काम निष्ठेने केले. आधुनिक काळात वचनपितामह डॉ फ गु हळकट्टी, डॉ एम एम कलबुर्गी यांनी संशोधन ,संकलन, प्रकाशन करुन हे २१ व्या शतकापर्यंत हे साहित्य लोकांपर्यंत प्रवाही ठेवले. नंतरच्या काळात अनेक अभ्यासक , लेखकांनी वचनसाहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित केले आहे.
डॉ भीमराव पाटील सरांनी आजपर्यंत एकूण ८० + पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. इतिहास, शरणस्थळे, शरणचरित्र, संशोधन, संकलन, तत्वज्ञान या प्रकारचे साहित्य सरांनी निर्माण केले आहे. १९९६ च्या सूर्यकांत घुगरे सरांच्या लेखापासून त्यांचा हा शरणसाहित्याचा प्रवास अविरत सुरु झाला आहे. आजही तो अविश्रांत सुरु आहे. त्यापैकी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर , महात्मा बसवण्णांची जीवनकथा, महात्मा बसवण्णा व्यक्ती, समाज आणि मूल्य, शरण संस्कृतीचा मराठी भूभागावरील प्रभाव, बसवपाठ, कुडलसंगम- बसवकल्याण- उळवी ही पर्यटनपुस्तिका, अक्कमहादेवीची जीवनकथा, काश्मीरचे शरण (५ भाषेत प्रकाशित ) , संत तुकडोजी- व्यक्ती आणि कार्य, पंडित काशिनाथ संकाये (जीवनचरित्र), कित्तुरची वीरांगना राणी चेन्नम्मा, बेलवडीची मल्लम्मा, केळदी चेन्नम्मा , लिंगायत राजघराणे, शरणस्थळे, बौद्धस्थळे, महात्मा बसवण्णा चरित्र, कार्य आणि संविधान मूल्यसंदेश, आपले महामानव, व्याख्यानदीप हे विशेष प्रसिद्धी पावलेले ग्रंथ आहेत.
*डॉ. भीमराव पाटील सरांच्या लिखाणाचे एकूण ९ भागात विभाजन करता येते ते असे -*
१ चरित्रात्मक ग्रंथ
२ ऐतिहासिक राजघराणे इतिहास ग्रंथ
३ अभ्यासक्रमावर आधारित ग्रंथ
४ बौद्ध धम्म संस्कृती ग्रंथ
५ संपादन ग्रंथ
६ संशोधनात्मक ग्रंथ
७ शरणस्थळे पर्यटन ग्रंथ
८ वक्तृत्व कला ग्रंथ
९ वचन अकादमी पुणे प्रकाशित महाग्रंथ.
*ग्रंथालय*
शरणकुंज वास्तूत २५००० पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे. प्राचीन साहित्य आणि बौद्ध साहित्यग्रंथ, पुरोगामी साहित्य, शरण साहित्य दालन, वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह, धार्मिक सांस्कृतिक इतिहासविषयक ग्रंथ, संशोधन आणि पर्यटन ग्रंथ, राजकीय इतिहासाविषयी ग्रंथ, इतर ग्रंथ संपदा असे एकूण २५००० ग्रंथाचे समृद्ध भांडार अभ्यासकांसाठी खुले आहे. आजवर संशोधन करणाऱ्या अनेक संशोधकांनी या ग्रंथालयाचा लाभ घेतला आहे. याचे विस्तृत वर्णन ग्रंथ व ग्रंथालयप्रेमी : डॉ भीमराव पाटील या लेखात वाचा. ( व्याख्यानदीप)
*भाषणाचे बाळकडू*
शालेय शिक्षण घेणाऱ्या भीमाला भाषणाचे बाळकडू मिळाले. तो प्रसंग ते पुण्याच्या भाषणात रंगवून सांगत होते, तो आजही मला आठवतो. स्वातंत्र्यदिनाचा दिवस होता. बाल भीमाच त्या दिवशी पहिलच भाषण होत. भाषणाचा विषय होता," पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल ". त्यांनी हे भाषण केल ते गावकऱ्यांना खूप आवडले. त्यांना पहिलं बक्षीस मिळालं ते २ रु आणि ५० पानांची वही. हेच पहिलं भाषण आणि हेच पहिलं बक्षीस. त्यानंतर या पहाडी वक्ताचा जीवनप्रवास सुरु झाला. एका दिव्याने असंख्य दिवे लावावे , तसच एका वक्त्याने असंख्य वक्ते या महाराष्ट्रात घडविले. शाहू कॉलेजच्या वत्कृत्व आणि वादविवाद विभागाचे सर प्रमुख आहेत. वत्कृत्व आणि वादविवाद या विषयावर त्यांनी एकूण ४ ग्रंथ लिहिले आहेत. शाहूची ५ मी महामानवांची जयंती सर सक्रिय सहभाग घेऊन साजरे करतात. सरांच्या अनेक विद्यार्थ्यांना वत्कृत्वासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाले आहेत, हे अभिमानास्पद आहेच !
बसवव्याख्याता, शाहूची बुलंद तोफ, बसवएक्स्प्रेस, महाराष्ट्राचा युवा वक्ता या पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
*आपणांस जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्या जीवनाची शतकापूर्ती व्हावी , ही बसवचरणी सदिच्छा.* 💐💐
No comments:
Post a Comment