शशिकांत महाजन यांचे रूपाने मार्गदर्शक छत्र हरपले
सातारा दि 1 - विशेष लेख - रवी वाकडे
प्रचलित समाज व्यवस्थेत सर्वांनी शिक्षणाची कास धरून आपला वैचारिक विकास साधला पाहिजे.आजूबाजूच्या समाज घटनांचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे.चांगल्या घटनांचे कौतुक करून वाईटावर प्रहार करत ' समाज पुरूषाची ' प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.हा जागृत विचार घेवून सांगली जिल्ह्यातील 'तडसर वांगी'या छोट्याशा गावातून कराड सारख्या मोठ्या शहरात स्थायिक होऊन आपल्या धारदार लेखणीने कराड तालुक्यातील अनेक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे धडाडीचे ज्येष्ठ पत्रकार शशिकांत महाजन लिंगैक्य होऊन आज वर्ष होत आहे.
गत दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्ग साथीने सर्वत्र हाहाकार माजवला.आणि यातच शशिकांत महाजन यांचे दुर्दैवी निधन झाले. हि घटना सर्वांच्या अंतःकरणा ला दुःख देवून गेली.शशिकांत महाजन यांनी खऱ्या अर्थाने 'पत्रकारी ' चा श्री गणेशा कराड मध्ये सुरू केला.याच बरोबर सातारा जिल्ह्यातील 'क्राईम रिपोर्ट ' मध्ये पण त्यांनी आपला दबदबा निर्माण करून सोडला होता. ठोक पत्रकारिता करताना कोणाचाही मुलाहिजा न बाळगता 'चांगल्याचे कौतुक आणि वाईटावर प्रहार 'या न्यायाने जे वास्तव सत्य असेल तेच समाजासमोर आणण्याचा त्यांनी हयातभर प्रयत्न केला.मनात राग ठेवून कोणाची बदनामी पण केली नाही आणि आर्थिक व भौतिक लाभ मिळावा म्हणून कोणाची हुजरेगिरी पण केली नाही.
कै.शशिकांत महाजन यांनी ज्या काळात पत्रकारिता सुरू केली तो काळ हा मुद्रण काळातील मंद गतीचा होता.पण मुद्रण व प्रसार माध्यम तंत्रात जे जे वेगवान बदल घडत गेले.ते सर्व काळानुरूप आत्मसात करत त्यांनी आपले ' ' ' धावपळीचे साहित्य ' कायम सजग ठेवले.सकारात्मक पत्रकारितेला आक्रमक बनवत त्यांनी आपल्या लेखणीला तलवारी च्या पात्याची धार दिली,बाणाच्या टोकाची बोचरी वेदना दिली.आणि आपले परखड विचार मांडून समाज विकासाच्या कार्यात एक डोळस मार्गदर्शक म्हणून पण आपली भूमिका बजावली. अनेक नवीन पत्रकारांचे ते मार्गदर्शक दिपस्तंभ बनले.आजच्या काळातील पत्रकारांनी त्यांनी जे लेख व बातम्या लिहील्या त्याचे अवलोकन केले तर त्यातून बरीच लेखन कौशल्ये शिकता येतील.यात शंकाच नाही.
प्रचलित काळात त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला.ते सर्व जण त्यांच्या विचाराने प्रभावीत होऊन बोलते,करते व लिहिते झाले.त्यांनी केवळ स्वहिताचा विचार न करता कायम समाजहित पाहिले.निस्वार्थी भावनेने पत्रकारिता क्षेत्राला न्याय दिला तर हे क्षेत्र समाजात वावरताना पत्रकारांना नेहमी उंच मानेने वावरत ठेवेल.यावर त्यांची निष्ठा होती.त्यासाठी समाज घटनांच्या माहितीचा त्रिकोण नेहमी डोक्यावर उभा राहील.याची दक्षता घेवून तंत्रशुद्ध लेखन केले.बातमी होण्यासाठी त्या घटनेतील वेगळेपण आपल्या चाणाक्ष नजरेने टिपून ते वाचकाच्या खास लक्षात आणून दिले.वृत्तपत्राला केवळ दैनिक म्हणून न पाहता 'समाज रक्षक सैनिक 'म्हणून उभे करण्यात शशिकांत चा वाटा खूप मोठा आहे.बातमीचा सत्य मागोवा घेण्यासाठी त्याची लेखणी कराड व पर्यायाने सातारा जिल्ह्याच्या दाही दिशांना सत्याचा शोध घेत राहिली.वृत्तपत्र हेच जनतेचे खरे मित्र बनविण्यासाठी त्याने आपल्या पत्रकारितेत प्राण पणाला लावला.समाजाचे दोन स्तंभ असलेले 'आहे रे ' आणि 'नाही रे ' यांनाही त्याने समाज प्रवाहात न्याय मिळवून दिला.समाज व्यंगावर बोट ठेवताना विनोदाचे चिमटे काढून दुःखाची सल कमी केली.आणि स्वसुधा रणा करण्यास भाग पाडले.लोक जागृती,लोकशिक्षण,मनोरंजन पर लेखन करताना प्रसिद्धीच्या हव्यासापायी कधी स्वतःला त्यात दाखवले नाही.पडद्या मागच्या सुत्रधारा प्रमाणे त्याने समाजाचा रंगमंच आपल्या प्रगत विचाराने हालता ठेवला. बातमी वृत ,व्यक्तिचित्रण,मुलाखत,ऐत्याहासिक लेख अशा प्रकारच्या त्याच्या सर्व लेखनात नवल,गूढ,विस्मय यांची झाक दिसायची.पत्रकारिता करताना व्यक्तिगत जीवन अनुभव, भेटी गाठी,संभाषण,निरीक्षण या सर्व अनुभवांना त्याने समाज अनुभव म्हणून न्याय दिला.वाचकांची अभिरुची,काळाचा विचार,वेळ महत्त्व,लक्ष,अवधान खेचून घेण्याची वृत्ती,या सर्व शैल्या त्याला जन्मजात व अंगभूत प्राप्त झाल्या होत्या.त्याची वृत्त प्रतिभा हि नैसर्गिक ' देव देणगी ' होती..
पत्रकारितेची हौस आणि त्या हौसेला न्याय देण्यासाठीआपल्या जन्मभूमीत मर्यादा पडतील म्हणून कर्मभूमी म्हणून कराडला त्यांनी जवळ केले. येथील शहरी जीवनाशी जुळवून घेत याच शहरात त्यांनी आपला संसार खुल व ला मनिषा वहिनी,डॉ.शुभम हे तुझे भावी आदर्श आहेत .तुझे उर्वरित कार्य निश्चितपणे ते पुढे चालवून पूर्ण करतील याची खात्री आहे. कराड शी एकरूप होताना एस. टी.कर्मचारी,वृत्तपत्र कर्मचारी,एजंट,पत्रकार,वार्ताहर,टपरी वाले सर्व मित्र परिवार यांना त्याने आपलेसे केले.हीच तुझी खरी जीवन संपत्ती ठरली.आज तू जाऊन बघता बघता वर्ष उलटले.अनेक वर्षांमागून वर्षे जातील.परंतु तुझी आठवण कायम स्मरणात राहील.हीच कुटुंब,नातेवाईक,मित्रपरिवार,वृत्तपत्र संघ, वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुमच्या कार्याला विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment