Thursday, April 21, 2022

संसार चक्रातून पार करणारे भजन म्हणजे चक्रीभजन होय : श्री काशी जगद्गुरू


संसार चक्रातून पार करणारे भजन म्हणजे चक्रीभजन होय : श्री काशी जगद्गुरू

काशीपीठात गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन
वाराणसी दि 21 : प्रा अजय शेटे। काशीपीठामध्ये जगद्गुरू पट्टाभिषेकाच्या निमित्ताने सुरू असलेल्या ४१ दिवसांच्या धार्मिक सभेत औसा येथील वीरनाथ मल्लनाथ संस्थानचे सद्गुरू श्री. ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या चक्रीभजनाच्या दिव्य सान्निध्यस्थानातून आशीर्वचन देताना काशी जगद्गुरू महास्वामीजींनी असे उद्गार काढले. 
       आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भजन एक नामस्मरणाची पद्धती आहे.  मानसिक जपाची पद्धती आहे. मानसिक जप जेव्हा बहिरंगात होते त्यालाच भजन म्हटले जाते. भजनामध्ये परिसरातील सर्व लोकांचा समावेश केला जातो. समष्टी सात्विक ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती भजनामध्ये आहे. औसा संस्थान परंपरेमध्ये चक्रीभजनाचे महत्त्व दोनशे वर्षांपासून जपले आहे. या संस्थानचे चार पिढ्यांपासून आध्यात्मिक कार्य सुरू आहे. सध्या पाचव्या पिढीचे श्री गुरुबाबा महाराज गेल्या ३२ वर्षांपासून कार्यरत आहेत. काशीपीठ आणि औसा संस्थानचे संबंध गेल्या दोनशे वर्षांपासून आहेत. नाथषष्ठीचा पहिला कार्यक्रम काशीमध्ये संपन्न झाला. त्यावेळी काशीपीठाचे प्रथम वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी जगद्गुरुपदी विराजमान होते. या संस्थानला त्यांनी आश्रय दिला होता. शिवलिंगाची स्थापना करून नाथषष्ठीचा कार्यक्रम संपन्न केला होता. हे शिवलिंग आजही काशीपीठामध्ये आहे. जेव्हा नाथषष्ठीचा कार्यक्रम होतो त्यावेळी या लिंगाला अधिष्ठान मानून कार्यक्रम संपन्न केला जातो.
            औसा संस्थानमध्ये चक्रीभजन नित्यकर्म मानले जाते. जीवन असेपर्यंत कधीही न चुकणाऱ्या कर्माला नित्यकर्म म्हटले जाते. हिंदू परंपरेमध्ये संध्यावंदन, वीरशैवांमध्ये इष्टलिंग अर्चना नित्यकर्म मानले जाते. तसेच औसा संस्थानमध्ये इष्टलिंग पूजेबरोबरच चक्रीभजन नित्यकर्म मानले जाते. इष्टलिंगधारी साधक कुठेही गेला तरी नित्य इष्टलिंग पूजा करतो. तसे औसा संस्थानचे मठाधीपती कुठेही गेले तरी चक्रीभजनाचे नित्य कर्म करतात. सुतक असले तरी हे भजन थांबत नाही. औसेकर घराणे वीरशैव परंपरेतील आहे. वंश परंपरेतून आलेली इष्टलिंग पूजा आणि चक्रीभजन या दोन्हीचे नित्यकर्म म्हणून पालन केले जाते. नित्य चक्रीभजनाशिवाय ते प्रसाद घेत नाहीत.
       या माध्यमातून सर्व धर्मीय भक्तांचा समावेश केला जातो. चक्री भजनाच्या माध्यमातून जनतेला संसार चक्रातून सहजपणे पार पाडण्याचे उत्कृष्ट कार्य औसा संस्थानच्या माध्यमातून होत आहे. ही परंपरा अखंडपणे सुरू राहो असा आशीर्वाद महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात दिला. कार्यक्रमाच्या नेतृत्वस्थानी असलेले काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांनी होटगी मठ आणि औसा संस्थानच्या मधुर संबंधाविषयी गौरवोद्गार काढले.
       यावेळी गुरुबाबांसह सर्व शिष्य मंडळींना शाल, रुद्राक्षमाला अर्पण करून महास्वामीजींनी आशीर्वाद दिला. या कार्यक्रमाला औसा संस्थानचे गुरुबाबा महाराज, त्यांचे सुपुत्र ज्ञानराज महाराज, सिद्धराज महाराज तसेच संपूर्ण परिवार, त्यांचे शिष्यगण आणि भारतातील विविध प्रांतातून आलेले भक्तगण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...