Thursday, April 14, 2022

तूप आणि पुरणपोळीचा महाप्रसाद देणारे नागणसुरचे महास्वामी कालवशत्यांच्या निधनामुळे भक्तावर शोककळा


तूप आणि पुरणपोळीचा महाप्रसाद देणारे नागणसुरचे महास्वामी कालवश
त्यांच्या निधनामुळे भक्तावर शोककळा 

सोलापूर : दि 15 :- राजशेखर बुरुकुले लिंगायत TV live प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात तूप आणि पुरणपोळीचा महाप्रसाद देणारे नागणसुरचे महास्वामी कालवश
 नागणसूरच्या  बसवलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती श्रीमनिप्र रेवणसिद्धेश्वर महास्वामी वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धापकाळाने शिवैक्य   झाले. पुरणपोळी आणि तुपाचा ते दासोह चालवायचे. त्यांच्या निधनामुळे भक्तावर शोककळा पसरली आहे.
----–----------------------------------------
श्रीमनिप्र रेवणसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या निधनामुळे भक्तांवर शोककळा, आज सायंकाळी अंतिम संस्कार
--------------–-----------------------------
 तुपाचे होमहवन केल्याने तृप्ती मिळत नाही. तेच तूप गरजूंना खाऊ घातल्यास तृप्ती मिळेल, या माणुसकीच्या भावनेतून होमहवन न करता कर्मकांडाला थोपवून धरत विज्ञानवादी दृष्टिकोन पेरण्यासाठी महास्वामींनी आयुष्यभर चळवळ उभी केली. पूर्व मठाधिपती बसवलिंगेश्वर महास्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाच हजार जंगम, पाच हजार सुवासिनी यांची ओटी भरून पुरणपोळी आणि तुपाचे पंचपक्वान्न महाप्रसाद ते देत होते. तूप चमच्याने नव्हे तर जग, तांब्याने वाढले जाते. या महाप्रसादाचा लाखो भक्त एकाच दिवशी आस्वाद घेत तृप्तीची ढेकर देतात.  10×12 जागेत एक खोली असलेल्या मठाचे एक विशाल वटवृक्षात  रुपांतर करणारे धर्मप्रसारक, समाज प्रबोधनकार, युगप्रवर्तक महास्वामी ते होते. मानवीयता, दयाभाव, प्रबोधन हे त्यांचे कार्य होते. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीला ते प्रोत्साहन द्यायचे. यामुळे मठामध्ये दरवर्षी भजन, भारुड, नाटक असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. सामुदायिक विवाह सोहळा करून सर्वधर्मसमभावही त्यांनी जपला होता. दरवर्षी होणाऱ्या मठाच्या उत्सवात स्वखुशीने मोफत वाहतूक सेवा बजावली जायची. या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून भाविक मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे. त्यांच्या कार्यामुळे नागणसूर बसवलिंगेश्वर मठाला तूप, पुरणपोळीचे मठ आणि महास्वामींना तुपाचे तीर्थ देणारे महास्वामी या नावाने ओळखले जायचे. त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सातारा जिल्हा लिंगायत समाज यांचे वतीने स्वामीजींना भावपुर्ण श्रद्धांजली

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...