Monday, April 18, 2022

वासोटा दुर्ग रक्षिणी - लिंगायत राणी ताई तेलीन उर्फ राणी रमाबाई तथा रमाई

 वासोटा दुर्ग रक्षिणी - लिंगायत राणी ताई तेलीन उर्फ राणी रमाबाई तथा रमाई.
विशेष लेख - प्रा.अजय शेटे, व डू ज.
सातारा दि.17 - सातारा जिल्ह्यातील बामणोली  गावच्या दुर्गम परिसरात ई. स.1770 मध्ये एका अतिशय गरीब तेली कुटुंबात ताई तेलीन उर्फ रमा यांचा जन्म झाला.लहानपणापासून त्या दिसण्यास अतिशय सुंदर गोऱ्यापान ,मोठ्या हाडाच्या असल्यामुळे पटकन कोणाच्याही नजरेत भरत असत.वय वर्षे 8 लाच त्या अतिशय उंच्या पुऱ्या व आकर्षक दिसू लागल्या होत्या.साहजिकच त्यांचे लग्न अतिशय गडबडीने एका वयाने अडीच पट असलेल्या एका गरीब तेली कुटुंबातील मोठ्या मुलाशी करण्यात आले.त्यांच्या माहेरी व सासरी दोन्ही कडेही अतिशय हलाखीची परिस्थिती होती.नवरा बायको कुटुंबातील सर्व घटक अतिशय कष्टाची कामे करून उदर निर्वाह करत असत.वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत त्यांना कोणतेही अपत्य झाले नाही अशातच अचानक पणे त्यांचे पतीही मरण पावले व त्या बाल विधवा झाल्या.अशा परिस्थितीत सासरच्या लोकांनी त्यांना आसरा देण्यास नकार दिला.त्यामुळे त्या माहेरी आल्या.त्यामुळे घरची परिस्थिती आणखीनच बिकट झाली.
बामणोली मध्ये एका मराठी सरदारांचा वाडा होता.ते औंध संस्थानचे प्रतिनिधी यांच्या सेवेत कार्यरत होते.पंतप्रतिनिधींनी त्यांना जाहगिरी देवून दोनशे सैन्याची फौज पदरी दिली होती.या सरदारांच्या पत्नी नायकी न बाई म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांनी माहेरी आलेल्या रमाबाईला आश्रय दिला.थोड्याच दिवसात दोघींची घट्ट मैत्री झालीआणि त्या सख्ख्या बहिणी प्रमाणे राहू लागल्या.
रमाबाईंची बुद्धिमत्ता अतिशय प्रगाढ कुशाग्र होती.शिवाय त्यांना अतिशय सुंदर रुपाची देणगी लाभली होती.त्या अतिशय कष्टाळू होत्या.त्यांना उंच धिप्पाड मजबूत कणखर शरीर यष्टी लाभली होती.
बामणोली च्या भल्या मोठ्या मोकळ्या मैदानात सैनिक रोज घोडेस्वारी,तलवारबाजी, भालाभेक,नेमबाजी, दांड पट्टा व द्वंद्व युद्ध यांचा सराव करत असतं.मराठा सरदारांनी पत्नी नायकीन बाई यांचेसाठी शंभर सैन्य राखून ठेवले होते.साहजिकच साहसी रमाबाई या सैन्याबरोबर सराव करत युद्ध तंत्राच्या सर्व गोष्टी शिकून त्यात त्या तरबेज झाल्या.त्यांची तगडी शरीरयष्टी,ताकद व युद्ध कौशल्य यांची महती अल्पावधीतच बामणोली परिसरात पसरली.
  नायकीन बाईंची वासोटा किल्ल्यावर असलेल्या गुहेमधील  श्री नागेश्वर शंभू महादेवा वर विशेष भक्तीश्रद्धा  होती. तिथून त्या जवळच असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात पण दर्शनासाठी जात असतं.तिथे जाण्यासाठी तलाव पार करून होडीने जावे लागत असे.पुढे घनदाट जंगलातून वर चढत चालावे लागत असे.त्यामुळे वाटेत अनेक हिंस्त्र अशा वाघ,बिबटे,रानडुकरे, साप प्राण्यांचा सामना करावा लागत असे.त्यामुळे त्यांना रमाबाईंच्या रूपाने एक खंबीर ,साहसी मैत्रीण हक्काने बरोबर नेण्यासाठी मिळाली होती.शिवाय इतर काही सैनिक बरोबर असायचेच.
वासोटा हा किल्ला अतिशय दुर्गम घनदाट जंगलाचा भागात असलेमुळे सुरक्षित पण चढण्यास अवघड होता.त्यामुळे छ.शिवरायांनी याचे नाव बहादूरगड उर्फ व्याघ्र गड ठेवले होते.हा किल्ला औंधचे पंतप्रतिनिधी यांच्या जहागिरीत  व सातारा गादीच्या देखरेखीखाली होता.त्याचबरोबर औंध, कराड,विशाळगड, सातारा येथे पण या संस्थांची जहागिरी होती.ही सर्व संस्थाने पुढे पुण्याचा पेशव्यांचा अखत्यारीतील सत्तेत येत होती.
स्वराज्याचे पहिले मंत्री परशुराम त्र्यंबक कुलकर्णी हे औंध चे पहिले पंतप्रतिनिधी होते.थोरले छ.राजाराम महाराज यांनी त्यांना पंतप्रतिनिधी ही पदवी दिली होती. छत्रपती,अमात्य यांच्यानंतर थेट पंतप्रतिनिधी यांचा मान होता.
विशाळगड व औंध या संस्थान ची जहागिरी वंशपरंपरेने थेट पंतप्रतिनिधी ना प्राप्त झाली होती. औंधचे पंतप्रतिनिधी भगवानराव ( भवानराव ) पंतप्रतिनिधी यांचे दि.30ऑगस्ट 1777 ला निधन झाले.आणि विलक्षण दैववाद असा की,याच दिवशी परशुराम पंत श्रीनिवास राव पंतप्रतिनिधी यांचा जन्म झाला.त्यावेळी नानासाहेब फडवणीस( फडणीस ) हे पेशवे कारभार पदी होते.कृष्णराव जोशी हे औंध व कराड येथील वकील होते. 
पंत परशुराम पंतप्रतिनिधी अठराव्या वर्षीपासून बामणोली ला येवू लागले.वयाच्या विसाव्या वर्षी पर्यंत त्यांची पहिली दोन लग्ने झाली होती.याच वेळी ते बामणोली येथे आले असता त्यांना अठरा वर्षे पूर्ण केलेल्या बालविधवा रमाबाई यांच्या विषयी  
माहिती कळली.प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर योद्धी  असलेल्या रमाबाईंच्या अप्रतिम सौंदर्याने व तगड्या शरीर यष्टी ने त्यांना भुरळ घातली.
साहजिकच थोड्याच दिवसात त्यांनी रमाबाईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.औंध,कराड या दोन्ही जहा गिरीचा मालक आपल्याला पत्नीचा दर्जा देतोय.त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला व त्या लग्नास तयार झाल्या.लग्न करून त्या चांगल्या लिहायला,वाचायला शिकल्या.राजकारण,प्रशासन यांचे धडे त्यांनी अतिशय कमी वेळात आत्मसात केले.संपत्तीचा सर्व हिशोब त्या अगदी अचूक ठेवू लागल्या.त्यांना राणीचा दर्जा मिळाला तरी मूळ गरिबी तील दिवस त्या विसरल्या नाहीत.सर्वांना गरजे वेळी यथोचित मदत करण्यामुळे त्या लोकप्रिय पावू लागल्या.उत्तम नेतृत्व गुणांमुळे त्यांनी सैन्य व प्रशासन यांचेवर अल्पावधीत मजबूत पकड मिळवली.
सुरुवातीच्या काळात पुण्याचे पेशवे कारभारी नानासाहेब फडवणीस व पंतप्रतिनिधी यांच्यात थोडा वादविवाद होत असे परंतु किरकोळ तडजोड होऊन तो लगेच मिटत असे.पण त्यानंतर दुसरे बाजीराव पेशवे हे पुण्याच्या गादी वर बसले.ते तरुण व आग्रही, हट्टी व बंडखोर स्वभावाचे होते.त्यांनी अतिरिक्त महसुलासाठी पंतप्रतिनिधी यांना जाच करण्यास सुरुवात केली.महसूल व जहागिरी याबाबत दोघांच्यात वारंवार खटके उडू लागले.दुसरे बाजीराव मुत्सद्दी होते.परंतु वारंवार आक्रस्ताळी भूमिका घेवून पंतप्रतिनिधी ना   लष्करी कारवाई ची धमकी देवू लागले.त्यामुळे खटके वाढून वाद वाढत गेला.सन1806 नंतर तर हा वाद आणखीनच विकोपाला गेला.आणि पंतप्रतिनिधी यांनी पेशव्यांना मानायलाच नकार दिला व ते सातारा
 छत्रपती यांनाच जास्त मानून कारभार करू लागले.पेशवे पण सातारा 
छत्रपती यांचे ऐकत नव्हते. छ.प्रतापसिंह महाराज हे आतून सर्व सहकार्य परशुराम पंत यांना करत होते.परशुराम पंत आणि रमाबाई यांनी पेशव्यांच्या विरोधात सरळसरळ युद्ध पुकारले.
पेशव्यांचे सेनापती दौलत राव शिंदे व सेनापती बापू गोखले हे भले मोठे सैन्य व तोफखाना घेवून पंतप्रतिनिधी यांच्यावर चालून आले.तसे परशुराम पंत आपली जहागिरी असलेल्या वासोटा किल्ल्यात आश्रयाला गेले व रमाबाई कराड ला गेल्या.आपल्या सैन्या च्या अशा दोन तुकड्या त्यांनी केल्या.परशुराम पंत तीन हजार सैन्यासह पेशव्यांच्या विरोधात सरळसरळ युद्धास भिडले.मसूर जवळ घनघोर असे मोठे युद्ध झाले.सन 1806 च्या या युद्धात परशुराम पंतांचा एक हात तुटला व डोक्याला मोठी जखम झाली.मरणासन्न अवस्थेत त्यांना कैद केले गेले व पुणे येथे नजरकैदेत ठेवण्यात आले.एक हात युद्धात तुटल्यामुळे त्यांची ' थोटोपंत ' या नावाने अवहेलना होऊ लागली.
पंतप्रतिनिधी यांना कैदेत ठेवल्यानंतर औंध संस्थान ची जहागिरी सहजाहजी ताब्यात येईल हा बापू गोखले यांचा मोठा गैरसमज ठरला.अजून सर्व किल्ले पंतप्रतिनिधी यांच्याच ताब्यात होते. शूर रमाबाई यांनी स्वतः चिलखत,युद्ध वस्त्रे,जिरेटोप अंगावर घालून व घोड्यावर बसून मसूर च्या गढीवर हल्ला चढवला व गनिमी कावा करून ताबा घेतला व इतर अनेक युद्ध कैद्यांची सहिसलामत सुटका केली.त्यामुळे पेशव्यांची मोठी नाचक्की झाली.
रमाबाई पुढे सरळ वासोटा किल्ल्यावर गेल्या.त्यांनी भली मोठी शिबंदी व रसद किल्ल्यावर भरू न ठेवली.
.वासोटा हा किल्ला अतिशय दुर्गम भागात असून  महाराष्ट्र सह्याद्री पर्वताच्या रांगात दबून बसलेला देखणा बिबट्या वाघच होता.म्हणूनच छ शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याचे नाव 'व्याघ्रगड 'असे ठेवले होते.हा वासोटा किल्ला कोल्हापूरचे शिलाहार भोज राजे यांनी बाराव्या शतकात बांधला होता.एकूण दोन वासोटा किल्ले शेजारी शेजारी असून एक नवा व एक जुना असा आहे.सध्याचा वासोटा हा नवा वासोटा असून तो आदिलशहा अथवा इतर कोणत्याच सुलतानाला जिंकता आला नाही.शिलाहार भोज राजांनंतर येथे शिर्के व जावळीचे मोरे या राज घराण्यांची सत्ता होती.यांच्या पूर्वेला घनदाट मोठे जंगल असून कोयना नदी आपल्या अफाट वेगवान पाण्यासह वाहत आहे.दुसरी कडे दुर्गम असे कोकण कडे आहेत.वसिष्ठ या ऋषींनी या दुर्गम भागात तपश्चर्या केल्यामुळे याला वासोटा हे नाव मिळाले.जावळीच्या मोऱ्यांचा पाडाव झाल्यानंतर छ.शिवरायांच्या ताब्यात हा किल्ला होता.राजकीय कैदी ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असे. सिद्धी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळी ब्रिटिशांनी तोफा पुरवल्या होत्या.या छ.शिवरायांशी गद्दार ठरलेल्या इंग्रज अधिकारी हेनरी रिविंग ट न व ह्यारेन स्यामुयल यांना महाराजांनी येथेच कैद करून ठेवले होते.सन 1679 ला छ.शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून भक्कम बांधकाम केले.त्यावेळी त्यांना भोजराज कालखंडातील सव्वीस हजार सोन्याची नाणी सापडली होती.
अपमान झालेला सेनापती बापू गोखले अतिशय त्वेषाने पुन्हा वासोट्यावर मोठी फौज व तोफखान्या सह चालून आला. मेढा,सातारा,बामणोली मार्गे तो वासोट्याजव ळ आला.वासोट्याची दुर्गम चढण पाहून त्याची बोबडीच वळली. व गुर्मी उतरली.सन 1807 मध्ये त्याने वासोटा सहजासहजी जिंकणे अवघड आहे असे समजून रमा बाईंशी समजोता व तडजोडीची बोलणी सुरू केली. व युद्ध न करता जहागिरीचा वाटा मागू लागला.पण त्याच्या या लाप ट वृत्तीला भीक घालेल ती रमाई कसली ? रमाई ने बापू गोखल्याचा हा प्रस्ताव सरळसरळ धुडकावून लावला आणि आपल्या बाणेदार वृत्तीने उत्तर दिले की,
"श्रीमंत पंतप्रतिनिधीं चा किल्ला आहे वासोटा,
बापू गोखल्या सांभाळ तुझा 
कासोटा ,
ताई तेलीन मारील ' सोटा '
ताई तेलीनीच्या उर्फ रमाबाईंच्या या उत्तराने बापू गोखल्याला शेकडो इंगळ्या ढसल्या.रमाबाई ची सर्वत्र वाहवा होऊ लागली.तुफान चिडलेल्या रमाबाई किल्ल्या बाहेर येवून तुफान लढल्या.त्यांचे रौद्र रूप पाहून बापू गोखलेला  तीन महिने सपाटून मार खाल्ल्यावर ,खजिना  नाश झाल्यावर व अनेक सैनिक मृत्युमुखी पडल्यावर पेशव्यांनी  पुण्यास माघारी बोलावले.एका बाईच्या हातून पेशव्यांचा शुर पराक्रमी सेनापती  बापूची बदनामी झाली होती.
वासोटा किल्ला सरळ सरळ ताब्यात मिळणे शक्य नव्हते.तेव्हा पुन्हा जोरात तयारी करून बापू वासोट्यावर चालून गेला.त्याने अचानक गडाला वेढा देवून सगळी रसद बंद केली.तसेच एक नवी युक्ती करून नव्या वासोटा किल्ल्याशेजरी असलेल्या जुन्या  उंच वासोटा किल्ल्यावर रस्ता करून,झाडी तोडून तोफा चढवल्या.यावेळी हजार सैनिक लोक त्याने कामाला लावले.या कामाविषयी सांगताना तो स्वतःच  लिहतो की,
' डोंगर झाडी मनस्वी ,
अडचण बहुत,
सात कोस,अडीच मास,
तेव्हा मार्ग झाला.'
जवळ जवळ वीस किलोमीटर  चा रस्ता करण्यासाठी अडीच महिने हजारो सैनिक राबले तेव्हा जुन्या वासोट्यावर जाण्याचा व तोफा चढवण्याचा मार्ग तयार झाला.
बापू गोखले याचा यामध्ये एक वैयक्तिक स्वार्थ पण होता.औंध ची जहागिरी ही त्या काळातील सर्वात श्रीमंत जहागिरी होती.आणि ती त्याच्याच ताब्यात राहणार असलेमुळे तो पेशव्यांचा सर्वात श्रीमंत सेनापती बनणार होता.म्हणून त्याने ताई वास्तव्य करत असलेल्या नव्या वासोटा  किल्ल्याला ताब्यात घेण्यासाठी उंच अशा जुन्या वासोट्यावरून हल्ला करण्याची योजना आखली.ठरल्याप्रमाणे जुन्या वासोटया वरून नव्या वासोट्यावर तुफान आग ओकणारे तोफ गोळ्यांचे हल्ले झाले.सलग आठ महिने हे हल्ले सतत चालले होते.आणि नेमका एक तोफ गोळा नव्या वासोट्याच्या धान्य शिबंदी वर पडला.आणि बघता बघता धान्याचे ते भले मोठे कोठार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.नाईलाजाने रमाई  सह सर्व सैन्याची उपासमार सुरू झाली.आठ महिन्यांनंतर रमाबाईनी शरणागती पत्करली.त्यांना ताब्यात घेवून साताऱ्यात कैद करण्यात आले.
औंध ची जहागीर दारी मिळाल्यामुळे बापू गोखले हा सर्वात श्रीमंत शक्तिशाली सरदार ठरला.असे ' हिस्टरी ऑफ मराठाज ' या ग्रंथात पाश्चात्य इतिहासकार जेम्स ग्रँड डफ याने लिहिले आहे.
रमाबाई यांची ही नजरकैद म्हणजे सोन्याचा पिंजरा होती.त्यांनी पेशव्यांना पत्र लिहून दोन मागण्या केल्या.एक म्हणजे त्यांना पुण्यात परशुराम पंत यांचे बरोबर ठेवले जावे अथवा वासोटा किल्ल्यावर ठेवले जावे.त्यात पहिली मागणी जर मान्य केली तर परशुराम पंत सारख्या पराक्रमी तोफेला रमाई न च्या रूपाने अग्नी बत्ती दिल्यासारखे होते.हे ओळखून तिची दुसरी मागणी मान्य करण्यात आली व तिला पुन्हा वासोट्यावरच नजर कैदेत ठेवण्यात आले.श्री भवानी,नागेश्वर गुंफेतील शिवलिंग पूजा करत त्यांचे जीवन मर्यादित स्वातंत्र्यात व्यतीत होवू लागले.
परंतु त्यांच्या अंगातील कर्तृत्वाची भीती कायम  बापूंना होती.त्यामुळे एक दिवस त्यांनी परशुराम पंत यांचा पेशव्यांच्या कैदेत असताना मृत्यू झाला.अशी खोटी आवई उठवली.परंतु ती बातमी ऐकल्यावर मात्र रमाबाई खूप दुखी होऊन हतबल झाल्या व झुरणीला लागल्या.त्यांनी अन्नत्याग केला व एक दिवस ही शुर सम्राज्ञी अतिशय विरहाच्या दुःखात हे जग सोडून स्वर्गवासी झाली.त्यानंतर त्यांची अंतिम इच्छा  म्हणून वासोट्याच्या   बुरुजा जवळ त्यांची समाधी  बांधण्यात आली.त्यानंतर दुसरा बाजीराव पेशवे व छ.प्रतापसिंह यांचे कुटुंब , परशुराम पंत  यांना  याच किल्ल्यावर आणून नजर कैदेत  ठेवले.तेव्हा एका हाताने रमाई च्या समाधीला कवटाळून हा महान योद्धा डोके टेकवून अतिशय  भावपूर्ण हतबल झाला.त्यांचा दुसरा हात असलेली रमाई नियतीने त्यांच्या पासून हिसकावून नेली होती.
बापू गोखले वासोटा आणि पर्याय ने औंध संस्थान चा जहागीरदार झाला व वासोट्यावर ऐष आरामी जीवन जगू लागला.पण त्याचा हा आनंद भावी काळात फार टिकू शकला नाही.
सन 1818 मध्ये जनरल फिजलर व एलफिन्स्टन या इंग्रज अधिकाऱ्यांनी बापू गोखले याचीच जुन्या वासोट्यावर तोफा चढवून नव्या वासोट्यावर हल्ला करण्याची युक्ती वापरून त्याचाच  'जशास तसे ' या न्यायाने पराभव केला.त्याला नजर कैदेत ठेवून इंग्रजांनी सातारा राजघराणे यांना रू.पाच लाख संपत्ती देवून तसेच दुसरे बाजीराव पेशवे यांना पुण्यास पाठवून व परशुराम श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांची सुटका करून पुन्हा औंधच्या गादीवर बसवले.स्वकियानी विरोध करून सुद्धा परक्या इंग्रजांनी या कृतीतून औंध संस्थानच्या गादीचा मान देश आणि जगभरात वाढवला.
अशी ही लिंगायत  सुस्वरूप,सुंदर,देखणी,आकर्षक व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले ली ,दुर्ग रक्षिणी,रणरागिणी,पट्टराणी  ताई तेलीन उर्फ रमाबाई तथा रमाई.तिच्या जीवन पराक्रमास समस्त देश वाशियांच्या वतीने मानाचा मुजरा.. मानाचा मुजरा.
जय भवानी.जय नागेश्वर शंभू महादेव 

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...