मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या 2 बहिणींना 11 हजारांची शिष्यवृत्ती
श्रुती मरगुर-बबलेश्वर हिचे पहिल्या पगारातील दातृत्व
वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 65 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सातारा दि.19 : प्रा अजय शेटे प्रतिनिधी
आयुष्यातला पहिला पगार म्हणजे आनंदाची पर्वणी. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पहिल्या पगाराचे अनोखे महत्व असते. कोणी पहिला पगार आहे तसा जपून ठेवतो, कोणी आपल्या देवाला अर्पण करतो तर कोणी आई, वडील, भाऊ आणि बहिण यांच्यासाठी खरेदी करतो. मात्र नुकतीच संगणक अभियंता बनून 'कॅप जेमिनी ' या कंपनीमध्ये नोकरीस लागलेली श्रुती मरगुर-बबलेश्वर हिने तिच्या पहिल्या पगारातील 11 हजार रुपये गरीब, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून देऊन समाजासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे.
शनिवारी 'श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालय ' येथे झालेल्या समारंभात श्रुतीच्या पहिल्या पगारातील 11 हजारांची रक्कम माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अक्षता व अंकिता स्वामी या दोन बहिणींना शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आली.
याप्रसंगी श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, संगणक अभियंता श्रुती मरगुर-बबलेश्वर उपस्थित होते.
याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ येथील अक्षता मल्लिनाथ स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, द्वितीय वर्ष), अंकिता मल्लिनाथ स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, प्रथम वर्ष) यांना शिक्षणासाठी 11 हजारांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. त्यांचे वडील मल्लिनाथ स्वामी यांचे व आई यांचे निधन झाले असून त्यांचे आजी व आजोबा शेतमजुरी करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहेत. तुटपुंज्या मजुरीमुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागत नव्हता. त्यांची हि अडचण वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांना समजली. श्रुतीने देखील आपल्या मनातील कल्पना तिचे मामा राजशेखर बुरकुले यांना सांगितली. अशा रीतीने दुतर्फा कार्य सिद्धीस पोहोचले. या दोघींसह वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 65 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
यावेळी श्रुती यांनी सांगितले की, "माझे आजोबा कै.रेवण सिद्धेश्वर मरगुर यांचा समाजसेवेचा आदर्श माझ्यासमोर आहे.ते नेहमी म्हणत असत की,प्रत्येकाला समाज काहीतरी देत असतो.तेव्हा आपणही समाजाला काहीतरी दिले पाहिजे.या भावनेतून मी हि शिष्यवृत्ती देत आहे.यापुढेही प्रतिवर्षी 11 हजार रुपये एका विद्यार्थिनीला देण्याचा माझा ठाम मानस आहे."
याप्रसंगी प्रा. प्रमोद मेणसे, प्रा. श्रीशैल मळेवाडी, प्रा. प्रमोद शिवगुंडे, प्रा. किरण गलगली, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, उपाध्यक्ष सिद्राम बिराजदार, सचिव नागेश बडदाळ, सहसचिव संजय साखरे, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, गंगाधर झुरळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी, शिव कलशेट्टी, राहुल बिराजदार, अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सचिन विभुते, बसवराज जमखंडी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर कोरे, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार बिराजदार यांनी तर आभारप्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी मानले.
No comments:
Post a Comment