Monday, May 30, 2022

पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर .प्रा.अजय शेटे.


पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.




 पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर 
विशेष लेख - प्रा.अजय शेटे.



सातारा, दि.30 -  
राणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी  या गावात झाला.त्यांचे वडील व्यंकोजीराव शिंदे हे माळवा प्रांत साम्राज्याचे पाटील होते.त्यावेळी मुलींना शिक्षणास बंदी होती.परंतु अहिल्याबाई यांना त्यांच्या  वडीलांनी शिक्षण दिले.त्या लहानपणापासून अतिशय आदर्श व कुटुंबांचे संस्कार घेवून समाजसेवेत अग्रेसर होत्या.
एकदा इंदोर संस्थानचे राजे मल्हारराव होळकर हे माळवा प्रांतात आले असता ते' छावणी' या गावी आले.त्यावेळी तेथील श्री शंकराच्या मंदिरासमोर आठ वर्षाची एक लहान मुलगी गरीब लोकांना अन्नदान करत होती.तिचे ते कार्य पाहून त्यांनी अधिक चौकशी केली असता ती अहिल्या असल्याचे त्यांना समजले.तेव्हा त्यांनी तिच्या वडिलांना आपला राजपुत्र मुलगा खंडेराव याचे साठी तिला लग्नाची मागणी घातली.


आणि वयाच्या फक्त आठव्या वर्षी अहिल्या इंदोर संस्थान ची राणी बनली.
तिथून पुढे सलग वीस वर्षे त्यांच्या संस्थान ची खूप भरभराट झाली.
    परंतु त्यानंतर ई. स.1754 च्या एका घनघोर युद्धात त्यांचे पती खंडेराव यांना वीरमरण आले. त्यावेळी 'सती 'जाण्याची प्रथा  अस्थित्वात होती.त्यांनी त्यासाठी तयारी पण केली होती.परंतु प्रगत विचाराचे सासरे मल्हारराव यांनी पहिल्यांदा विरोध करून त्यांना सती जाण्यापासून रोखले.त्यानंतर  बरोबर बारा वर्षांनी त्यांचे सासरे मल्हारराव हे इ. स.1766 मध्ये निर्वतले.त्यामुळे सन 1767 मध्ये स्वतः अहिल्याबाई होळकर यांनी राजमुकुट परिधान करून त्या इंदौर संस्थानच्या महाराणी बनल्या.सन 1767 ते सन 1795 पर्यंत त्यांनी इंदोर संस्थानचे नाव संपूर्ण भारत वर्षात गाजवून सोडले.
त्या अतिशय देवभक्त व न्यायप्रिय होत्या.सर्वांना त्या समान न्यायदान करत असत. राजा व प्रजा असा वेगळा भेदभाव त्यांनी कधी केला नाही.त्याबाबत एक कथा त्यांची सम न्यायदानाची पद्धत सांगून जाते.
त्यांचा मुलगा असलेला युवराज मालोजीराव याने इंदोर शहरात वेगाने घोडा रथ चालवून एका गायीच्या वासरास धडक दिली व तो वेगाने निघून गेला.यात वासरू जागेवरच गतप्राण झाले.त्यामुळे तीची आई गाय विव्हल अवस्थेत तिथेच बसून राहिली.सर्व प्रजा गर्दी करून हे दृश्य पहात होती.थोड्याच वेळात तेथून महाराणी अहिल्याबाई यांचा रथ आला.त्यावेळी अधिक चौकशी केली असता त्यांना त्यांच्या पुत्राचा पराक्रम समजला.त्यांनी त्या वासराच्या अंत्यसंस्काराची सोय करून त्या गोमातेस स्वतःच्या गोशाळेतून पालन पोषण आहार देण्यास सांगितले व त्या तडक राजदरबारात आल्या.त्यांनी युवराज मालोजीराव यांच्या पत्नी सूनबाई यांना बोलावून विचारले की,अशा प्रकारचा अपराध केला तर त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची शिक्षा करावी.त्यावर सूनबाईनी सांगितले की,त्याला सरळ कडक देहदंडाची शिक्षा देण्यात यावी .त्याबरोबर त्यांनी प्रधान व शिपाई याना पाठवून मालोजीराव यांना कैदी बनवून पकडुन आणले व देहदंडाची शिक्षा सुनावलीआणि जिथे ते वासरू मरण पावले होते त्याच चौकात हातपाय दोरखंडाने बांधून मालोजीराव यांना आणून टाकले. व घोडागाडी वेगाने अंगावर घालण्यास सांगितले.परंतु त्या अश्वरथास चालविण्यासाठी कोणीही सारथी तयार झाला नाही.हे पाहून स्वतः त्या रथामध्ये  बसल्या व रथ चालवू लागल्या.त्यावेळी तीच गाई त्या रथाला वारंवार आडवी येवू लागली व तिने अहिल्याबाईंना रोखले.हा चमत्कार पाहिल्यावर प्रधान मंडळींनी त्यांना शिक्षेत बदल करण्याची विनवणी केली.त्यामुळे नाईलाजाने त्यांनी मालोजीराव यास नगरातून बाहेर काढले व त्याचे युवराज म्हणून असलेले सर्व अधिकार काढून टाकले. ही दंतकथा ज्या चौकबाजारात  घडली त्याला त्यामुळेच 'आडा बाजार '  असे नाव पडले आहे.  ही घटना अहिल्याबाई महाराणी झाल्या त्या नंतर एकाच वर्षात घडली. त्यामुळे आई व पत्नी यांचेपासून दूर राहावे लागले मुळे पुढे  दुखी मनाने खचून अतिशय बिकट अवस्थेत मालोजीराव त्याच वर्षी मरण पावले.अशा प्रकारे ओळीने पती,सासरे व त्या नंतर एका वर्षात पोटचा मुलगा मरण पावल्याचे दुःख पचवून त्यांनी इंदोर संस्थान चा राज्यकारभार मोठ्या जिद्दीने चालू ठेवला.
एक स्त्री ही इंदोर संस्थान चा राज्यकारभार पहात आहे.हे पेशवे साहेबांना योग्य वाटत नव्हते.त्यांनी इंदोर संस्थानच्या वेशीवर सैन्य नेवून इंदोर संस्थान वर पुरुष राजा बसवण्याचा आग्रह धरला.परंतु  त्यांनी आपले सेनापती तुकोजीराव यांना पेशवे सरकार यांचे कडे पाठवून एक पत्र त्यांच्या स्वाधीन केले.त्या मध्ये लिहले होते की, माझ्या वडिलांनी मला बंदी असताना  पण शिक्षण दिले,माझे सासरे यांनी मला' सती 'जाण्यापासून रोखले.दोघेही स्त्री चा आदर करणारे होते.समानता मानणारे होते.त्यामुळेच मी स्त्रियांचे सैन्य उभे करू शकले.आपण जबरदस्ती करून मला पायउतार कराल तर आमचे स्त्रियांचे सैन्य तुमच्याशी युद्ध करेल.जर त्यात तुम्ही जिंकला तर एका दुःखी स्त्रीचे राज्य हिसकावून घेतले असे दूषण तुम्हाला लागेल.आणि जर आम्ही जिंकलो तर हा अपमान  तुम्ही पचवू शकणार नाही.असे टोचणारे शब्द ऐकल्यावर पेशवे सैन्याचा विचार बदलला व त्यांनी आम्ही फक्त  तुमच्या शोक दुःखात सामील होण्यास आलो आहोत असे म्हणून त्यांनी महाराणी अहिल्याबाई यांची गाठ घेतली व दुखवटा काढून ते आल्या पावली माघारी फिरले.
      अहिल्याबाई या परकीय यावनी सत्तेपासून आपले राज्य सुरक्षित रहावे म्हणून सदैव तत्पर असत.त्यासाठी त्यांनी भगवान श्री शिवशंकराची उपासना करून आपले मनोसामर्थ्य प्रचंड वाढवले.श्री महादेवावर त्यांची खूप श्रद्धा होती त्यामुळे त्या नेहमी त्याची भक्ती करत.त्यांनी आपल्या राज्यात महेश्वर व इंदोर येथे अनेक मंदिरे बांधली.तसेच  सोमनाथ सह अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. त्यालाच सध्या ' जुने सोमनाथ ' किंवा ' अहिल्याबाई मंदिर ' असे म्हणतात.धर्मशाळा बांधल्या,शिक्षणाची सोय केली,पाण्यासाठी मोठ्या विहिरी खोदल्या.पूजापाठ संस्कार केंद्रे उभारली. लष्करी शिक्षण देवून स्त्री सैन्याची पलटण उभी केली.

                                
श्री भगवान शिवशंकरा प्रती असलेल्या भक्तिभावामुळे त्यांचा राजपत्रात व राजआज्ञेत  सर्वात शेवटी स्वतःच्या मोहोर व स्वाक्षरी ऐवजी 'श्री शिव शंकर ' अशी नोंद त्या करत असत .त्यांनी छापलेल्या नाण्यांवर श्री शंकर, श्री नंदी,बेलपत्र यांची अनेक प्रकारची चित्रे होती.
अतिशय भक्तिभावाने त्यांनी आपले राज्य चालवले.सुशासन,दूरदर्शी कारभार पारदर्शक कारभार पद्धत यामुळे त्यांची कारकीर्द खूप गाजली. "आपल्या राज्याची सर्व संपत्ती ही श्री परमेश्वराची असून आपण फक्त तिचे राखणदार आहोत "असे त्या मानत. दि.31मे  रोजी त्यांची 297 वी जयंती पार पडत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास व आदिवासी विकास मंत्री  मा.ना.आण्णासाहेब डांगे ,इस्लामपूर यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर लिहलेले 'पुण्यश्लोक मातोश्री महाराणी साहेब - देवी अहिल्याबाई होळकर '  हे पुस्तक सर्व इतिहास प्रेमी,स्पर्धा परीक्षा अभ्यासक,  तसेच राजकीय ,सामाजिक रसिक वाचक यांनी जरूर वाचावे व आपल्या जीवनात त्यांच्या राजकारभार तत्वांचा अंगीकार करावा येव्हढीच त्यांच्या 298 व्या जयंती निमित्त माफक अपेक्षा. त्याच्या पराक्रमी कर्तुत्वाला त्रिवार वंदन . जय देवी अहिल्याबाई - जय शिव शंकर.  

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...