सामूहिक विवाह ही लोकचळवळ व्हावी : श्री काशी जगद्गुरू
सर्वधर्मीय 35 जोडपी झाले विवाहबद्ध
बागलकोट दि 25 : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकांवर झालेला आहे. विवाह समारंभ पार पाडणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. त्यामुळे सामूहिक विवाह ही सध्याच्या काळातील गरज बनली आहे. प्रत्येक गावागावात सामूहिक विवाह समारंभ झाले पाहिजेत. सामूहिक विवाह ही लोकचळवळ बनली पाहिजे असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील गिरीसागर येथील सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, काशीचे नुतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, बागलकोटचे आमदार इरण्णा चरंतीमठ, गिरीसागर कल्याण मठाचे मठाधिपती रुद्रमणि शिवाचार्य, मंद्रूप मठाचे मठाधिपती रेणुक शिवाचार्य तसेच बिलकेरी, कोळनुर, बिळगी, चळगेरी, मणीकेरी, मुत्तती आणि येमेगनूर येथील मठाधिपती उपस्थित होते.
यावेळी गिरीसागर कल्याण मठाचे मठाधिपती रुद्रमणि शिवाचार्य यांच्या जन्म सुवर्णमहोत्सव आणि पट्टाभिषेक अमृतमहोत्सव निमित्त 35 जोडप्यांचा विवाह पार पडला.
ते पुढे म्हणाले की सामूहिक विवाह समारंभ ही अनेक लोकांना उपयोगी आहे. सर्वधर्मीय सामूहिक विवाहामुळे समाजात एकोपा निर्माण होतो. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होता येते. अशा विवाह समारंभात जगद्गुरु, धर्मगुरू, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित राहून आशीर्वाद देतात. त्यामुळे सामूहिक विवाह समारंभात लग्न होणे ही देखील भाग्याची गोष्ट आहे.
No comments:
Post a Comment