वडूज येथील जागृत श्री हनुमान मंदिरात गुरूवार दि. 6 एप्रिल 2023 रोजी श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
सातारा, दि.5 - विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथील मुख्य पेठेत श्री हनुमानाचे भव्यदिव्य असे मंदिर असून, येथील श्री मारुतीची मूर्ती अतिशय बलदंड असून वीर मारुतीची असून, जवळ जवळ सहा फूट उंच आहे.
सन 1969 मध्ये वडूज मधील काही प्रतिष्ठित व्यापारी मंडळीनी एकत्र येवून सार्वत्रिक वर्गणी व वस्तू दान रूपातून येथील मुख्य चौकातील मोठ्या जागेत पंच क्रोशी तील अतिशय भव्य दिव्य अशा श्री मारुती मंदिराचे बांधकाम नामांकित कारागीर गवंड्या कडून पूर्ण करून घेतले व मंदिरातील भव्य मूर्ती ही मौजे सातेवाडी या गावातून मिरवणुकीने आणून स्थानापन्न केली .
हे मंदिर उत्तरा मुखी असून , पंचक्रोशीतील पाहिले आर.सी.सी. स्ट्रकचर स्वरूपाचे आहे. मंदिरा बाहेर भव्य सभा मंडप असून,आत मुख्य मंदिराचा मोठा हॉल आहे. व आत मध्ये उंच गाभारा असून तो फुलांची कलाकुसर व नक्षीने खुलवला आहे.त्यात बरोबर मध्यभागी उंच जागेवर श्री वीर हनुमान उजव्या एका पायावर विजयी मुद्रेेत उभे असून त्यांनी डाव्या पायाखाली राक्षस दाबून धरला आहे.
मंदिराच्या बाहेरील उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावर श्री गणेश,श्री लक्ष्मी,श्री पंच नाग,श्री नंदी व शिवलिंग यांच्या दगडी मूर्ती आहेत.
संपूर्ण मंदिर अतिशय सुशोभित व पूर्ण पणे रंगकाम केलेले आहे. त्यात रंगीबेरंगी नक्षी,फुले काढली आहेत.मंदिरात श्री मारुती स्तोत्र,श्री मारुती नमस्कार यांचे लेखन केले आहे. मंदिरा मध्ये श्री गणपती,श्री शंकर,श्री दत्त,श्री गजलक्ष्मी,श्री हनुमान यांचे फोटो असून,श्री बसवेश्वर महाराज व श्री शिवाजी महाराज यांचे पुतळे सुरक्षितरित्या काच लावलेल्या कपाटात प्रेरणा मूर्ती म्हणून स्थानापन्न केल्या आहेत.श्री बसवेश्वर जयंती व श्री शिवाजी महाराज यांची जयंती अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एकत्र पूजा करून साजरी केली जाते व नंतर मिरवणूक काढली जाऊन विचार मार्गदर्शन कार्यक्रम करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची मूर्ती ,धर्मवीर संभाजी राजे यांचे डिजिटल फ्लेक्स बॅनर पण मंदिरात आहे.संपूर्ण मंदिर अत्याधुनिक दिव्यांनी उजळले आहे. मंदिरात विद्युत माळांची आरास व रोषणाई असून फुलांच्या सुशोभित माळा आहेत.दररोज सुगंधी द्रव्ये ,धूप,अगरबत्ती दरवळत असतात.दर शनिवार व दररोज भाविक भक्तांची वर्दळ असते.हा वीर हनुमान भक्तांच्या नवसाला पावणारा आहे.मंदिर प्रांगणात दर शनिवारी पूजा साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असते.भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दक्षिणा,प्रसाद ,वस्तू दान करतात.
मंदिरातील श्री हनुमान हा वीर हनुमान असून त्याच्या सर्व पराक्रमाचे द्योतक आहे.या वीर हनुमाना साठी सव्वातीन किलो वजनाचे चांदीचे दागिने बनवण्यात आले असून प्रत्येक सण उत्सव वेळी ते परिधान केले जातात.या दागिण्यात चांदीची गदा,मुकुट,हार, वाळे, तोडे यांचा समावेश आहे.मूर्तीला चांदीचे डोळे असून काळ्या मिशा व भुवया श्री हनुमानाचे करारी पराक्रमी रूप प्रतीत करते. श्री मूर्तीस भरजरी रेशमी वस्त्रे परिधान केली जातात. दर अमावस्या पौर्णिमेला श्री मूर्तीस शेंदूर व तेल यांचे माजने केले जाते.पुरुष भक्त गाभाऱ्यात जाऊन जवळून व महिला गर्भगृहा बाहेरून थोडे दुरून दर्शन घेतात.पुजारी व स्थानिक भक्त सेवाभाव करतात.
गुरुवार, दि.6 रोजी पहाटे 4 वाजले पासून श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन केले असून,पहाटे पाच वाजता किर्तन होणार असून,त्यानंतर शिव योगिनी महिला मंडळा तर्फे पाळणा होईल ,त्यानंतर सूर्योदया चे वेळी प्रभू श्री हनुमान जन्म घेतील व लगेच आरती,भजन,प्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. आदल्या दिवशी रात्री पासून भजन सुरू करून वातावरण निर्मिती केली जाते.त्यामुळे भक्तीचा दुग्ध शर्करा योग जुळून येत असतो.तरी या पुण्य काळ जन्मोत्सव कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती नित्य कार्यक्रम आयोजक व्यापारी गणेशोत्सव मंडळ व ग्रामस्थ वडूज यांनी केले आहे.
श्री.हनुमान जयंती नंतर दुसरे दिवशी मंदिर प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंदिराच्या बाहेर दोन प्राचीन वीर गळी असून त्यावर कोरीव मूर्ती आहेत.सदर मंदिराचा उपयोग अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी खूप पूर्वीपासून केला जातो. सभा मंडपात बाहेर बैठक कठडे आहेत. जवळच सूचना फलक आहे. मंदिरा बाहेर शक्तीचे प्रतीक असलेली 120 किलो वजनाचा दगडी गोल गोटा आहे. याच श्री मारुतीच्या साक्षीने अनेक वरांनी आपली भावी नववधू निश्चित केली आहे. त्यामुळे सर्व तालुका व वडूज पंचक्रोशी तील भाविक भक्तांची या श्री वीर मारुती वर विशेष श्रद्धा आहे.
सदर श्री हनुमान जन्म पुण्य काळात सर्वांनी वेळेत हजर श्री मारुतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.असे आवाहन उत्सव संयोजक समिती ने केले आहे.



No comments:
Post a Comment