लाखो भाविकांचे श्रद्धास्थान , श्री . तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा ,गुरुवार दि ५ रोजी पाली यात्रा या निमित्ताने विशेष लेख .
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री . तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा ,गुरुवार दि ५ रोजी पाली यात्रा या निमित्ताने विशेष लेख .
उंब्रज दि 4 :-रविंद्र वाकडे.
पुणे- कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर पाली हे गाव आहे. या गावावरूनच येथील देवाला ' पालीचा खंडोबा ' या नावाने ओळखतात.
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत ( खंडोबा ) पाली हे ठिकाण महाराष्ट्र्रातील सातारा या जिल्ह्यात आहे . शंकराचे अवतार असणारा पाली खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे .पुणे- कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर पाली हे गाव आहे. या गावावरूनच त्याला ' पालीचा खंडोबा' या नावाने ओळखतात. हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात .जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते .श्री खंडोबा देवाचे मंदिर हे तारळी नदीच्या तीरावर आहे .पुण्यापासून १३५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तेथे जाण्यासाठी २ तासाचा वेळ लागतो .
सदरच्या देवस्थानात दररोज ४ वेळा पूजा अर्चा केली जाते. देवस्थान हेमाडपंथी असून ते सुमारे १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात नारळ वाढवीत नाहीत. बकरीचा पशुबळी दिला जातो. येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर श्री खंडोबाचे व म्हाळसाचे लग्न लागते, त्याची पौराणिक कथा खालीलप्रमाणे –
ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीचे रूपावर शंकर भाळले, त्यावेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन. त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव 'महालयाशक्ती 'असे ठेवले.तीच म्हाळसा.
तिने तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्येचे रूप धारण केले व तिचा विवाह सदर वाण्याने मार्तंड भैरवाशी पौष शु. पौर्णिमा या दिवशी करून दिला. म्हाळसा व महाळसाकांत येथूण गुप्त झाले आणि ते शिवलिंगरूपाने प्रकट झाले. त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी म्हाळसाकांत हे नाव पडले. पालाई गवळण यांच्या भक्तीप्रीत्यर्थ येथे देव निर्माण झाला म्हणून 'पालाई ' या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले.
सदर देवाचा पुजारी दरवर्षी बदलतो. त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिनी बदलतो. गावाची वस्ती २,५०० असून तेथील महादेवांस उमा-महेश्वर या नावाने संबोधले जाते. देवास फुलाचा कौल लावला जातो. कौल उजवा दिल्यास देवाचे करणे काही राहिले नाही व कौल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील भाविक लोक मानतात. सदरच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यास अंदाजे रु १२ लक्ष खर्च अपेक्षित आहे. सदरचा खर्च हा भक्तांच्या देणगीतूनच करण्यात येतो. सदरच्या जीर्णोद्धाराचे काम श्री. चंद्रशेखर स्वामीनाथन शेखाई (तामिळनाडू) हे करीत आहे. सध्या देवस्थानचे व्यवस्थापक म्हणून श्री. लक्ष्मण दिगंबर वेदपाठक हे आहेत.
खंडोबाच्या लग्नकथा –
एक वाघ्या – खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास ' वाघ्या 'तर स्त्रीस' मुरळी ' असे म्हणतात. खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई उर्फ पालाई धनगर आहे. मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापार्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले ,असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणार्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला.
एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.
पालीचा खंडोबा यात्रा –
श्री खंडोबा व म्हाळसा यांची विवाह यात्रा प्रसिद्ध असून, यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात. भाविकांनी दिलेल्या देगणीतून ४ लाख ५१ हजार रुपये किंमतीची ११ किलो चांदी, १ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे ६६ किलो पितळ आणि जवळपास ७७ हजार रुपये किंमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे सात लाख रुपये किंमतीचे आकर्षक सिंहासन तयार करण्यात आले आहे.
पालचेर पश्चिमेकडील डोंगरावर खंडोबाची कुमारिका बहीण हंजाई यांचे स्थान असून त्यास विंध्यवासिनी असे म्हणतात. सदरचे ठिकाण हे १५ कि.मी. अंतरावर आहे.
अविनाश इंजेकर श्री खंडोबा पाली पुजारी यांचा संपर्क
मोबाईल क्र. +91 90218 64264 असा आहे.श्री खंडोबा देवाची
इतर प्रसिद्ध स्थाने पुढील प्रमाणे आहेत.
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी ,२) निमगाव,३) पाली-पेंबर सातारा,४) माळेगाव,५) सातारे (औरंगाबाद),६) शेंगूड (अहमदनगर),७) नळदुर्ग (धाराशिव-उस्मानाबाद),८) वाटंबरे.




No comments:
Post a Comment