Tuesday, January 4, 2022

अनाथांची माय अनंतात विलीन .. थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन

 अनाथांची माय अनंतात विलीन 
.. थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन 
..प्रा.अजय शेटे.. वडूज..9823540239.
..सातारा.. दि.4..वर्धा येथील विदर्भ कन्या ..थोर समाजसेविका.... अनाथांची माय माउली ह्या उपाध्या प्राप्त केलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे आज मंगळवार दि.4 रोजी रात्री 9.00 वाजता पुणे येथील ग्यलक्सि हॉस्पिटल येथे निधन झाले..
.. सिंधूताई सपकाळ यांचे जीवन चरित्र अतिशय प्रेरणादायी असे होते.सिंधूताईंच्या आईंचा शिक्षणाला विरोध होता पण वडील मात्र शिक्षण प्रेमी असलेमुळे त्याचे ई.4 थी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होऊ शकले.त्यानंतर त्यांच्या आईने शिक्षणास प्रचंड विरोध करून त्यांना म्हशी राखण्यास पाठवू लागली.तेव्हा शिक्षण प्रेमा मुळे त्या म्हशी नदीच्या पाण्यात बसवून शाळेत जात..पण एक दिवस त्याच म्हशी  दुसऱ्या व्यक्तीच्या शेतात शिरल्या व त्यांनी पीक खाल्ले त्यावेळी आईकडे तक्रार गेली व सिंधू ताईंची शिक्षण चोरी आईस समजली..या गोष्टीचा प्रचंड राग येवुन त्यांच्या आईने  बालवयात वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचे लग्न एका निरक्षर अडाणी अशा 35 वर्षे वयाच्या इसमाबरोबर लावून दिले..
..पुढे सिंधुताई संसारात रमल्या पण त्यांची वाचनाची आवड काही कमी झाली नाही.. किराणा दुकाना तून आलेले रद्दीचे पेपर  त्या वाचून काढत असत..या गोष्टीचा राग त्यांच्या पतीस येई. व तो त्यांना मारहाण करीत असे..
..पुढे सिंधू ताईंनी शेताबरोबर गुरे सांभाळली ..वर्ध्याचे जिल्हाधिकारी रंगनाथन यांच्याकडे स्थानिक दलाल शेणखत कसे अल्प दरात घेतात व शेतकऱ्यांची फसवणूक करतात हि गोष्ट निदर्शनास आणून देवून दलाली बंद केली व शासकीय दराने शेणखत विक्रीस सुरुवात केली व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून दिला.
.. पुढे विसाव्या वर्षी  सिंधुताई गरोदर राहिलेल्या असताना मागील राग मनात धरून स्थानिक दलालाने त्यांच्या पतीचे कान भरवून सिंधूताईंच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे आपलेच आहे असे सांगून त्यांचे चारित्र्य हनन केले..
..त्यामुळे पतीने प्रचंड रागाने त्यांना गाईच्या गोठ्यात मारहाण करून बेशुद्ध पाडले..तशा अवस्थेतच त्यांनी एका बाळास जन्म दिला..त्यानंतर पतीने त्यांना उपाशी पोटी घरातून कायम चे बाहेर हाकलून दिले..त्या दुसऱ्या गावात फाटक्या कपड्या निशी आल्या .त्या गावातील स्मशानभूमी जवळ थांबल्या..रात्र झाल्यावर त्यांना प्रचंड भूक लागली .त्या व त्यांचे बाळ रडू लागले..तोच लांबून काही माणसे मेलेले प्रेत घेवून येताना दिसली..बाळाच्या  रडण्याचा आवाज ऐकू येवू नये म्हणून त्या दूरवर अंधारात जावून बसल्या.. थंडी खूप पडली होती.गावकरी प्रेताचा अग्निसंस्कार करून निघून गेल्यावर त्या जळक्या चिते जवळ आल्या.आणि स्वतःला व बाळाला शेकुत लागल्या.जवळच सव्वा रुपया व पीठ ठेवलेले दिसले.त्यांनी जवळच पडलेल्या फुटक्या मडक्यात असलेल्या पाण्यात ते पीठ कालवून त्याची भाकरी तयार केली व झाडांची पाने गोळा करून त्यावर थापली व चीतेच्या निखाऱ्यावर भाजून खाल्ली व आपल्या बाळाला दूध पाजले. व तेथेच उबीत झोपून गेल्या.
..  सकाळी दहा दिवसांचे बाळ बरोबर घेवून त्या वर्ध्याच्या रेल्वे स्टेशन वर आल्या .दिवसभर रेल्वेत भीक मागत व रात्री तेथेच स्टेशनवर झोपत..असे दिवस काढता काढता त्यांनी भिकऱ्यांच्या पोरांचे पालनपोषण सुरू केले व त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली..
..हळू हळू त्यांचे हे महान कार्य अनेकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या या महान कार्याला अनेकांची मदत मिळू लागली. व तेथेच एक जागा भाड्याने घेवून त्यांचा अनाथ आश्रम सुरू झाला..अनेक आईबाप नसलेल्या मुलांच्या त्या माय बनल्या.पुढे त्यांनी 350 भाकड गाईंचे पालन पोषण करून त्यांना जीवनदान दिले..गो रक्षण करून देशी गाईंचे महत्त्व पटवून दिले.
..त्यांच्या या महान कार्याची महती पुढे देशभर व जगभर पसरली.त्यामुळे त्यांना 22 देशांत परदेश प्रवास करण्याचे भाग्य प्राप्त झाले. इंग्लंड राणी साहेब एलिझाबेथ यांचे बरोबर बंकिम हँग पॅलेस राजवाड्यात राजघराण्यातील व्यक्तींसोबत राज भोजन करण्याचा योग आला..अनेक परदेश वाऱ्या त्यांनी केल्या पण .. घार उडे आकाशी..पण तिचे चित्त पिलापाशी..या न्यायाने त्या पुन्हा लगेच आपल्या मायभूमी तील अनाथ आश्रमात माघारी येत व अनाथ मुले व गाई यांच्या माय बनून जात..
..सिंधू ताईना मराठी साहित्य वाचनाची खूप आवड होती. ग. ल.ठोकळ.. ग. दि.माडगुळकर..सुरेश भट यांच्या अनेक कविता त्यांना पाठ होत्या..सुरेश भटांच्या गझले प्रमाणेच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जगून काढले 
..त्या नेहमी म्हणत की..
..इतकेच मला जाताना सरणावर कळले होते..
..मरण्याने केली सुटका ..जगण्याने छळले होते..
..मी एकटीच त्या रात्री आशेने तेवत होती..
...मी विझले तेव्हा .. सारे आकाश उजळले होते.. सारे आकाश उजळले होते..
..अशा या माय माऊलीस भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन **
..
..

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...